Saturday, 16 February 2013

तुमच्या लग्नाचा वाढदिवस...


तुम्ही दोघांनी
एकमेकांच्या हाती हात दिलात,
त्याला वर्ष झालं...

या वर्षभरात एकमेकांवर रूसला असाल,
एकमेकांबरोबर हसला असाल,
वर्षभरातले असंख्य क्षण
एकमेकांबरोबर जगला असाल...

ही तर सुरूवात आहे...
कुणीतरी म्हटलंय ना...
“सुरूवात चांगली झाली की प्रवास उत्तम होतो.”
तुमचीही सुरूवात चांगली झालीय.
सहजीवनाचा प्रवासही असाच उत्तम व्हावा, याच शुभेच्छा!!!


Wednesday, 6 February 2013

तरी तडफड


किती दिवसांचं साठवून
एकाच वेळी बोलायचं
असंच होतं अलीकडे...

वेळ असतो,
मी असते अन् तू ही असतोस
तरीही
टाळत राहतो बोलणं...आपण...
खूप दिवस... खूप काळ...
मग बांध फुटतो...
पलिकडे तू, अलिकडे मी...

समोर असतो ना तर
बोलावंही लागलं नसतं

पण बरय
समोर नाही, तेच बरं आहे
तेच बरोबर आहे

एक चूक, एक थांबा... शिक्षा मात्र दोघांना
तुला तशी... मला अशी...
दु:खी नाही मी... तू ही नाहीस...
तरी तडफड
कळते फक्त, माझी तुला...तुझी मला...

Tuesday, 22 January 2013

पाऊस आलाय

पाऊस आलाय

सालाबादप्रमाणे

वेड्या आठवणी जागवायला

पुन्हा-पुन्हा मला लावतोय

माझ्याच मनावर रागवायला

वेडा पाऊस, वेडा...


वेडावणारा पाऊस वेडा

वेड लावतोय, वेडावतोय

कृष्णमेघांच्या सावलीमागून

आतुर होऊन बोलावतोय

भिजायला...


हो...भिजायचंय मलाही...

पण थोडं थांबावं लागेल...

हल्ली असंच करावं लागतं

मनात आलं, तसं वागलं,

मोकळं झालं, असं होतंच नाही...

थांबावंच लागतं

आणि मनालाही थांबवावं लागतं


पण येणार मी, नक्की...

मलाही भिजायचंय ना...

कळलंच नाही...



कोंदटलेलं आभाळ

कधी भरून आलं

कळलंच नाही...

पांढरेशुभ्र ढग

काळेभोर झाले

बरसून गेले

तरीही पाऊल

वळलंच नाही...

टपोरे थेंब

गालावर रूळले,

मातीत मिसळले

पापणीमधलेही...

कधी, कसे ते

मिसळून गेले

कळलंच नाही,

कळलंच नाही...




 

पावसाच्या पावलांनी...


पावसाच्या पावलांनी

कविता येते

सर होऊन

चिंब भिजवते

अंकुर होऊन

मनात रूजते

तरारून उठते

नकळत लाजते

कविता येते

पावसाचं बोट धरून

आल्या पावली

परत जाते

कविता जाते...

Saturday, 5 January 2013

तुझं-माझं?...आपलं...

तुझी ओळख पटली आणि

माझं मलाच नवल वाटलं

     तुझ्यावरल्या विश्वासाचं

     नवल माझ्या मनात दाटलं...


तुझं माझ्या विश्वात येणं

कसं अगदी सहज झालं

     कळलंच नाही कधी तुझ्यात

     माझं विश्व भेटत गेलं...


तुझ्या नजरेत माझी स्वप्नं

उमलताना दिसली मला

     सुखद भविष्याची चाहूल

     तूच दिली या ह्रदयाला...


तुझी ओळख पटली आणि

तुझं-माझं उरलं नाही

     नवं-नूतन वाटू लागलं

     जगात मला सारं काही...


एकच स्वप्न आता माझ्या

मनामध्ये मी जपलं

     अतूट नातं कायम राहो

     तुझं- माझं... आपलं....


अनिवार ओढ तुझी लागते...


स्वप्नांच्या सागरात माझी

नाव चालते पुढे

तुझीच प्रतिमा दिसू लागते

क्षितीजाच्या पलीकडे...


आभास मला होऊ लागती

दिशा-दिशांतून तुझे

तुला शोधताना जाणवते

अस्तित्व, तूच माझे...


अनिवार ओढ तुझी लागते

व्याकुळ ह्रदयाला

कातर झाल्या आतुर नजरा

तुझ्या दर्शनाला...


दूर किनारा, तूच सहारा

आता जगण्यासाठी

लाटांवरती आज स्वार मी

केवळ तुझ्याचसाठी...


सरतो आता संयम माझा

अंत तू पाहू नको,

एकदा तू भेट आणि

दूर तू जाऊ नको...!!!